लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका एक्स्प्रेस गाडीने उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये किमान १६ प्रवासी ठार तर ८०हून अधिक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंजाब प्रांतातील सादिकाबाद तहसीलमध्ये वाल्हर रेल्वे स्थानकामध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला क्वेट्टा येथे जाणाऱ्या अकबर एक्स्प्रेस गाडीने जोरदार धडक दिली, असे वृत्त ‘डॉन’ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

ही मालगाडी स्वतंत्र मार्गावर उभी असताना वेगाने येणारी अकबर एक्स्प्रेस चुकीच्या मार्गावर गेली आणि तिने मालगाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये १६जण ठार तर ८०हून अधिक जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर अकबर एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आणि रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले.

गाडीत अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्या प्रवाशांना अन्न-पाणी देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लष्कराचेही मदतकार्यात सहकार्य घेतले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अपघातामध्ये अकबर एक्स्प्रेसच्या इंजिनाचे पूर्ण नुकसान झाले आहे, तर अन्य तीन डब्यांचेही नुकसान झाले आहे. जखमींना जवळच असलेल्या सादिकाबाद आणि रहीम यार खान येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांकडे तातडीने लक्ष घालण्याचे आदेश इम्रान खान यांनी ट्वीटद्वारे अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानात दरड कोसळून ६ ठार

पेशावर : पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्य़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून पाच महिला आणि एका मुलासह सहा जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वात जिल्ह्य़ातील मातलतान परिसरामध्ये मुसळधार पावसाने दरडी कोसळल्या आणि त्याखाली एक घर गाडले गेले आणि हे सहा जण ठार झाले. मदतकार्य पथकाने ढिगाऱ्याखालून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले असून एका जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.