पाकिस्तानमधील लाहोरमध्ये स्फोट झाला आहे. लाहोर शहरातील अरफा करीम आयटी टॉवरजवळ स्फोट झाल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. दुपारी झालेल्या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले आहेत. डॉन न्यूजने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. जखमींपैकी अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाजवळ हा स्फोट झाला आहे.

‘लाहोर शहरातील अरफा करीम आयटी टॉवर परिसरातील अतिक्रमणाच्या विरोधात अभियान चालवले जात होते. या भागातील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जात असताना स्फोट झाला. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचे सहाय्य घेण्यात आले होते. पोलिसांच्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांचा स्फोटात मृत्यू झाला,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक इमरान अवान यांनी दिली आहे.

स्फोटानंतर आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या कर्मचाऱ्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा आत्मघाती हल्ला असण्याची दाट शक्यता आहे.