कोइम्बतूर/तिरुवनंतपूरम : तमिळनाडूतील तिरुपूर येथे गुरुवारी पहाटे केरळ परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत २० जण जागीच ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत. तिरुपूरच्या अनिवासी शहरामध्ये झालेल्या या दुर्घटनेतील मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.

केरळ परिवहन महामंडळाच्या दुर्घटनाग्रस्त बसच्या छायाचित्रावरून अपघात किती भीषण होता ते स्पष्ट होत आहे. चुकीच्या मार्गिकेतून आलेल्या ट्रकने या बसला धडक दिली आहे. जखमींना तिरुपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रक चुकीच्या मार्गिकेतून वेगाने आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली आहे, ट्रकचालक दारूच्या नशेत होता की ट्रकचा टायर फुटला ते स्पष्ट झालेले नाही, असे पलक्कडचे पोलीस अधीक्षक सिवा विक्रम यांनी सांगितले. ही बस बंगळूरु येथून तिरुअनंतपूरम येथे जात होती, तर ट्रक कोइम्बतूर-सालेम या विरुद्ध दिशेने येत होता.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला असून राज्याचे परिवहनमंत्री ए. के. शशीधरन आणि कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांना तातडीने तमिळनाडूला रवाना होण्याचे आदेश दिले आहेत. या बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे केरळच्या पलक्कड, थ्रिसूर आणि एर्नाकुलम जिल्ह्य़ांतील होते. या दुर्घटनेतून बचावलेले प्रवासी अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाहीत.