विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या २० खासदारांनी शुक्रवारी त्यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस सभापतींकडे दिली आहे.
संसदेतही एक किंवा दोन दहशतवादी आहेत, असे वक्तव्य साध्वी प्राची यांनी गुरुवारी केले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनला फाशी देण्यास विरोध करणाऱया खासदारांकडे साध्वी प्राची अंगुलीनिर्देश करीत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून मानले जात आहे. उधमपूरमध्ये बुधवारी जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद नावेद याला हिंदू संघटनांच्या हवाली करावे म्हणजे त्याला चांगला धडा शिकवता येईल, असे वक्तव्यही साध्वी प्राची यांनी केले होते. देशाच्या संसदेत एक किंवा दोन दहशतवादी आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. यापेक्षा दुसरे मोठे दुर्दैव असूच शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते.