मध्य प्रदेशच्या रतलाम येथील एका शाळेत विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय…’ घोषणा दिल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर या विद्यार्थ्यांना परीक्षेलाही बसू देण्यास शाळा प्रशासनाने मनाई केली आहे.

येथील नामली परिसरातील कॉन्व्हेंट शाळेत हा प्रकार घडला. शाळेतील नववी इयत्तेतील २० विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे शाळा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. या २० विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलण्यात आले. तसेच या सर्वांनाही परीक्षेला बसू देण्यासही मनाई करण्यात आली. ही गोष्ट मुलांच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी लगेचच पोलिसांकडे धाव घेतली. संतप्त पालक मोठ्याप्रमाणावर पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पालकांनी नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती आहे. पण या संपूर्ण घटनेबाबत शाळा प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही.