नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सकडून (एफएटीएफ) काळ्या यादीत वर्णी लागण्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमधील २० दहशतवादी छावण्या पाकिस्तानला जबरदस्तीने बंद करणे भाग पडले आहे. त्याचप्रमाणे या वर्षी उन्हाळ्यात सीमेपलीकडून घुसखोरी आणि कारवाई करण्यात आली नाही, असे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सूत्रांनी सांगितले की, आम्ही दिलेल्या गोपनीय माहितीमुळे पाकिस्तानला २० दहशतवादी छावण्या बंद कराव्या लागल्या. या छावण्यांमधून काश्मीरमध्ये दहशतवादी पाठविण्यात येत होते. अमेरिकेत जून महिन्यात झालेल्या एफएटीएफच्या बैठकीत ही बाब स्पष्ट झाली. तेथेच पाकिस्तानला करडय़ा यादीत कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता. आता पॅरिसमध्ये ऑक्टोबर महिन्यात एफएटीएफची बैठक होणार असून तेव्हा पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा मुद्दा चर्चेला येणार आहे.