दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जत्रेमध्ये २० महिलांवर धारदार ब्लेडने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यात घडली आहे. जेहानाबादच्या ठाकूर बारी भागात दरवर्षी दसऱ्याला जत्रेचे आयोजन केले जाते. काही असमाजिक तत्वांनी हा हल्ला केला. २० ते ३० वयोगटातील सर्वाधिक महिला या हल्ल्यामध्ये जखमी झाल्या आहेत असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

या महिलांच्या कमरेखालील भागावर वार करण्यात आले. या महिला रुग्णालयात आल्या तेव्हा रक्तस्त्राव सुरु होता. महिलांवर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जत्रेमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वत्र पळापळ सुरु झाली. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलांना रुग्णालयात दाखल केले.

हा हल्ला कोणी घडवून आणला त्यांचा शोध सुरु आहे असे जेहानाबादचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आलोक रंजन घोष आणि पोलीस अधीक्षक मनीष कुमार यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. महिलांवर झालेल्या या हल्ल्यानंतर स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. जत्रेला आलेल्या महिला आणि मुलींवर हल्ला होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.