२०१६ मध्ये जगभर ‘ग्रेट मुस्लिम वॉर’ होणार असल्याची भविष्यवाणी २० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. हे युद्ध २०१० साली अरब भूमीवर सुरू होऊन सीरियामध्ये लढले जाऊन, २०४३ मध्ये रोमच्या केंद्रस्थानी खिलाफतच्या स्थापनेबरोबर याचा अंत होणार असल्याचे यात म्हटले होते.
तिसरे महायुद्ध विश्वात मोठी उलथापालथ घडवून आणणार असल्याची भविष्यवाणी अनेक वर्षांपूर्वी नॉस्ट्राडॅमस नावाच्या ज्योतिषाने केली होती. अद्याप तशी संभावना दिसत नसली, तरी बाबा वेंगाने नॉस्ट्राडॅमसच्या ज्योतिषाचे समर्थन करत येणाऱ्या काळात संपूर्ण युरोपवर मुसलमानांचा कब्जा असणारी भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा ही बल्गेरियाची नेत्रहीन भविष्यवेत्ता होती. जवळजवळ २० वर्षांपूर्वी १९९६ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी तिचे निधन झाले.
‘डेली मेल’ या इंग्रजी संकेतस्थळामधील उल्लेखानुसार बाबा वेंगा ही वॉलकांसची नॉस्ट्राडॅमस म्हणून प्रसिद्ध होती. अमेरिकेतील ९/११ हल्ल्याबाबत आणि २००४ मधील सुनामीविषयी तिने अनेक वर्षांपूर्वी भविष्यवाणी करून ठेवली होती. बाबा वेंगावर विश्वास ठेवणारे आयसिस संघटनेचा उदय आणि वाढत्या प्रभावाला तिच्या भविष्यवाणीच्या रुपात पाहतात. येणाऱ्या काळात युरोपवर संकट येणार असल्याचेदेखील तिच्या भविष्यवाणीत म्हटले आहे.
बाबा वेंगाचे खरे नाव वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवा असे होते. बल्गेरियामध्ये जन्माला आलेल्या वेंगेलियाची दृष्टी वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत चांगली होती. एका मोठ्या वादळात तिच्या डोळ्यात धूळ जाऊन ती दृष्टीहीन झाल्याचे सांगितले जाते.