भारत-पाक सीमारेषेवर तब्बल २०० दहशतवादी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती, शनिवारी भारतीय लष्करातर्फे देण्यात आली. जम्मू-काश्मिरमधील पूर प्रलयानंतर या दहशवाद्यांकडून अनेकदा भारतीय हद्दीत घुसण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची माहिती लेफ्टनंट जनरल सुब्राता सहा यांनी दिली आहे. काश्मिरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीचा फायदा घेऊन हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतीय सुरक्षा दलांनी आतापर्यंत त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊन दिले नसल्याचेही, लेफ्टनंट सहा यांनी सांगितले.
काश्मिरमध्ये पुरामुळे लष्कराच्या ५० टक्के छावण्यांचे नुकसान झाले आहे. याच गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न अतिरेक्यांकडून केला जात आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी लष्कराकडून या भागात सुरक्षा कडे उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.