सीमेपलिकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये येण्यासाठी सुमारे २०० अतिरेकी सज्ज असले तरी, त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्करही तितकेच समर्थ असल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली.
१६ कॉर्प्सचे कमांडिंग ऑफिसर लेफ्ट.जन.डी.एस्.हुडा यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रम रेषा ओलांडून भारतात येण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले सुमारे २०० अतिरेकी सज्ज आहेत. अशा अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे २० ते ३० छावण्या सीमेपलिकडील भागात कार्यरत असल्याची माहितीही हुडा यांनी दिली.
सीमेपलिकडून होणाऱ्या या संभाव्य घुसखोरीबाबत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, शत्रूचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज असल्याचे हुडा यांनी सांगितले. लडाखमधील चीनी सैन्याच्या घुसखोरीबाबत प्रश्न विचारला असता, सीमेच्या त्या बाजूला काही ‘पायाभूत सुविधा व विकासात्मक’ कामे सुरू आहेत मात्र ते काम करणारी माणसे चीनच्या सैन्यातील आहेत किंवा कसे याबाबत माहिती मिळाली नसल्याचे लेफ्ट.जन.हुडा यांनी सांगितले.