काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याआधी मोदी सरकारने सुरक्षेच्या आघाडीवर मोठी तयारी केली होती. काश्मीरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन फक्त सैन्य तुकडयांचीच संख्या वाढवली नाही तर सॅटलाइट फोन, विशेष ड्रोन विमानेही सज्ज ठेवली होती. पुढचे काही महिने काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होईपर्यंत ही सर्व यंत्रणा तिथे सज्ज असणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहात कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. मात्र त्याआधीच रविवारी रात्री जम्मू-काश्मीरमध्ये फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. फोन आणि इंटरनेट बंद राहणार असल्यामुळे मागच्या आठवडयात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जम्मू-काश्मीर प्रशासनाला २ हजार सॅटलाइट फोन पाठवण्यात आले.

जुलैच्या अखेरच्या आठवडयात राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने (NTRO) इस्त्रायली बनावटीची हेरॉन ड्रोन विमाने पीर पंजाल येथे पाठवली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्याची योजना आहे. मागच्या दहा दिवसात निमलष्करी दलाच्या ३५० तुकडया काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्या. सध्या काश्मीरमध्ये ३५ हजारपेक्षा जास्त जवान तैनात आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय होणार हे मोदी सरकारमध्ये फार कमी जणांना माहित होते. चार ऑगस्टला संध्याकाळी अमित शाह यांनी रॉ चे प्रमुख सामंत गोयल आणि आयबीचे प्रमुख अरविंद कुमार यांना फोन करुन तयार राहण्यास सांगितले.