19 November 2019

News Flash

अयोध्या दहशतवादी हल्ला: चौघांना जन्मठेप, एकाची मुक्तता

एका आरोपीची कोर्टाने मुक्तता केली आहे

अयोध्येत २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप या चौघांवर आहे. प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चौघांना प्रत्येकी ४० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणात एकूण ६३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दहशतवादी हल्ल्यातील अरशद याला त्याचवेळी ठार करण्यात आले होते. ५ जुलै २००५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जण मारले गेले होते. तर काही सुरक्षा रक्षक जखमी झाले होते. या प्रकरणी इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसीम, मोहम्मद अजीज आणि फारूक हे पाचजण तुरुंगात होते. ज्यापैकी मोहम्मद अजीजची मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मागील १४ वर्षांपासून या प्रकराची सुनावणी सुरु होती. एका मोठ्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी निर्णय घेण्यासाठी १८ जून ही तारीख दिली होती. ज्यानुसार आज निर्णय घेण्यात आला. १४ वर्षांच्या कालावधीत ६३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या हल्ल्यातले दहशतवादी राम भक्त बनून अयोध्येत शिरले होते. त्यांनी या भागाची रेकी केली. त्यानंतर टाटा सुमो गाडीने प्रवासही केला. हल्ला करण्याआधी दहशतवाद्यांनी राम मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यानंतर गाडीमध्ये बसून रामजन्मभूमी परिसरात आले तिथलं सुरक्षेचं कडं मोडून ग्रेनेड हल्ला केला.

 

First Published on June 18, 2019 4:04 pm

Web Title: 2005 ayodhya terror attack case prayagraj special court sentences four convicts to life imprisonment and acquits one person scj 81
Just Now!
X