दिल्लीत २००५ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेला आरोपी मोहम्मद हुसैन फजिली यांनी दिल्ली पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत. तुरूंगात असताना पोलीस आमच्याकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी विष्ठा तोंडात कोंबायचे आणि त्यानंतर चपाती व पाण्याबरोबर ती गिळायला लावायचे. ते दिवस आठवले की अजूनही माझ्या अंगावर शहारा येतो, असे फजिली याने सांगितले. दिल्लीत २००५ साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने फजिली याला श्रीनगरमधून ताब्यात घेतले होते. अटक होण्यापूर्वी फैजिली हा श्रीनगरमध्ये शाल विणण्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो सध्या श्रीनगरमधील घरी परतला आहे.

फजिली याने तब्बल १२ वर्ष तुरूंगात काढली असून या काळातील अनुभव त्याने सांगितला. पोलिसांनी आमच्याकडून गुन्हा कबूल करवून घेण्यासाठी शक्य त्याप्रकारचा मानसिक व शारीरिक छळ केला. ते दिवस आठवले तरी माझ्या अंगावर शहारा येतो. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून अटक करण्यात आल्यानंतर आम्हाला सुरूवातीला लोधी कॉलनी येथील पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. आम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वी आमचा मोठ्याप्रमाणावर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. माझे हात पाठीमागे बांधून मला जमिनीवर झोपवले जात असे. त्यानंतर दोन पोलीस माझ्या पायांवर उभे राहत आणि एकजण माझ्या पोटावरून चालत जात असे. काही पोलिसांनी मला डिटर्जंटची पावडर असलेले पाणीही प्यायला लावले. आम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वी कोणतीही तक्रार न करण्यासाठी धमकावण्यात यायचे. ते म्हणायचे, न्यायाधीशांसमोर तोंड उघडाल तर खबरदार, तुम्ही असे केलेत तर आत्तापेक्षा वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल. तसेच पोलिसांनी अनेक कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने आमच्याकडून सह्या करवून घेतल्या. तुम्ही निर्दोष आहात, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, तुमच्यावर गुन्हे दाखल करायचे अनेक मार्ग आमच्याकडे आहेत, असे पोलीस वारंवार धमकावत असल्याचेही फैजिलीने सांगितले. फैजिली साधारण ५० दिवस दिल्ली पोलिसांच्या कोठडीत होता. त्यानंतर त्याला तिहार जेलमध्ये हलविण्यात आले. त्यावेळी आमचे हाल थांबले. मात्र, तिहार कारागृहात इतर कैद्यांकडून आमच्या जीवाला धोका होता. सुरूवातीला हे कैदी आमच्याशी अत्यंत आक्रमकपणे वागत. एकदा तर त्यांनी मला बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेले होते. मात्र, न्यायालयातील खटला जसजसा पुढे सरकर गेला तसतशी या कैद्यांच्या मनातील माझ्याविषयीची अढी दूर होत गेली. ज्यादिवशी मला निर्दोष मुक्त करण्यात आले तेव्हा याच कैद्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला, असेही फैजिली याने सांगितले.

२९ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्लीतील पहाडगंज, सरोजिनीनगर आणि गोविंदपुरी या भागांमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. दिल्ली पोलीसांनी केलेल्या तपासात या स्फोटांच्या संशयाची सुई ही लष्करे तोयबाकडे होती. पोलीसांनी संशयावरून काश्मिरी युवक तारिक अहमद दार याला अटक केली होती. या स्फोटात ६२ जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जण जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध २५० साक्षीदार न्यायालयापुढे हजर केले होते. तसेच दोषींचे फोन कॉल रेकॉर्ड, न्यायवैद्यक अहवाल हेदेखील सादर केले होते. २००८ मध्ये तारिक दार, मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद रफिक या तिघांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. दार याच्यावर हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप होता तर अन्य दोघांवर गुन्हेगारी कट रचणे, युद्ध पुकारणे, शस्त्रास्त्र कायद्याचा भंग, खून आणि खूनाचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले होते. दार हा लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असल्याचे ठोस पुरावेही दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना सादर केले होते. मात्र, न्यायालयात सबळ पुराव्यांअभावी मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद रफिक यांची सुटका करण्यात आली होती.