२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितला सोमवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला. सुप्रीम कोर्टाने कर्नल पुरोहितला जामीन मंजूर केला असून ९ वर्षांपासून कर्नल पुरोहित तुरुंगात होता. कर्नल पुरोहितपूर्वी साध्वी प्रज्ञासिंहला देखील जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे प्रज्ञासिंहपाठोपाठ आता कर्नल पुरोहितही तुरुंगातून बाहेर येणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्ट. कर्नल पुरोहितचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला होता. याविरोधात पुरोहितने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कर्नल पुरोहितच्या याचिकेवर शुक्रवारीच सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने जामीन अर्जावर निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने पुरोहित यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत पुरोहित यांच्यावतीने प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली होती. ‘कर्नल पुरोहित गेल्या ९ वर्षांपासून तुरुंगात आहेत. अद्याप त्यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आलेले नाही’ याकडे साळवेंनी सुप्रीम कोर्टाचे लक्ष वेधले. तसेच, पुरोहित यांच्यावरील ‘मोक्का’ही हटवण्यात आला आहे असेही साळवेंनी निदर्शनास आणून दिले होते. एनआयएनेदेखील मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी ‘मोक्का’ या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याची गरज नसल्याची भूमिका मुंबईतील विशेष न्यायालयात मांडली होती. मालेगाव बॉम्बस्फोटातील आणखी एक आरोपी साध्वी प्रज्ञासिंहला काही महिन्यांपूर्वीच जामीन मंजूर झाला होता. कर्नल पुरोहितला जामीन मंजूर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंहच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. मोदी सरकारने तपास यंत्रणांना स्वातंत्र्य दिल्याने आता सत्य समोर येत आहे असे त्यांच्या वकिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

काय होते प्रकरण?
मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी मशिदीबाहेर बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. रमझानच्या अजाननंतर मशिदीबाहेर पडलेल्या सात जणांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा तपास करत हिंदूत्ववादी संघटनांनी हा स्फोट घडवल्याचा गौप्यस्फोट केला होता. साध्वी आणि पुरोहित यांच्यासह एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करणाऱ्या एटीएसने आरोपपत्र मात्र १४ जणांविरोधातच दाखल केले होते.