मोशेच्या आजोबांचे मनोगत
काळ हे सगळ्या दु:खावर औषध असते असे म्हणतात, पण मुंबई हल्ल्यात वाचलेल्या मोशे होल्झबर्ग या मुलाचे आजोबा राबी शिमॉन रोसेनबर्ग यांच्यासाठी मात्र अजूनही जखमा भळभळतच आहेत. त्यांचा नातू मोशे याचे आई-वडील नरिमन हाऊस येथील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते तेव्हा तो दोन वर्षांचा होता. २००८ मध्ये मोशे अनाथ झाला. त्याचे वडील राबी गॅव्हरियल व आई रिव्हका हे दोघे त्यावेळी मारले गेले. रिव्हका त्यावेळी पाच महिन्यांची गर्भवती होती.
नरिमन हाऊस या मुंबईच्या छाबाड लुबाविच ज्यू सेंटरमधील भागात हा हल्ला झाला होता. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी तेथे चारजणांना ओलिस ठेवले होते. त्यावेळी मोशे तेथेच होता. त्याची भारतीय नॅनी सँड्रा सॅम्युअल हिने गोळ्यांनी चाळण झालेल्या आईवडिलांच्या मृतदेहासमोर बसलेल्या लहानग्या मोशेला त्या अवस्थेतही सांभाळले होते. सुदैवाने मोशे यात वाचला पण मातृपितृ छत्र राहिले नाही. नॅनी सँड्रा आता जेरुसलेमला असते. ती आठवडय़ातून एकदा मोशेला भेटायला येते. काळ या जखमा भरत असतो पण आमच्यासाठी गेल्या दहा वर्षांत वेदना वाढतच गेल्या आहेत असे आजोबा रोसेनबर्ग सांगतात.
मोशे मोठा होत गेला तो आता जे प्रश्न विचारतो आहे त्यांना उत्तरे देणे आम्हालाही कठीण आहे. तो आई-वडिलांविषयी विचारतो, मी आजोबांबरोबर का राहतो आहे याचीही विचारणा करतो. आता आम्ही वृद्ध झालो आहोत व त्याचे प्रश्न नैसर्गिक आहेत, असे ते म्हणतात. भारत सरकार व तेथील लोकांकडूनजो पाठिंबा मिळाला त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, भारतातील लोक व सरकारने आमच्या पाठिशी उभे राहून आधार दिला. त्यांचे आम्ही आभारी आहोत. लोक आता सुरक्षेतील त्रुटी व इतर अनेक गोष्टींबाबत बोलतात पण आमचा परमेश्वरावर विश्वास आहे. भारतातील लोकांनी आम्हाला जी मायेची उब दिली त्याबाबत आम्ही ऋणी आहोत.
मोशेची नॅनी सँड्रा हिने म्हटले आहे की, मोशे आता मोठा झाला आहे. दहा वर्षे उलटून गेली यावर विश्वास बसत नाही. तो विचारही मनाचा थरकाप उडवतो पण मोशेने आम्हाला जगण्याचे सामथ्र्य दिले. तो आता बुद्धिमान मुलगा झाला आहे.रिव्हका व राबी गॅव्हरियल यांना वाचवण्यासाठी काही करू शकले नाही याची अजून माझ्या मनात खंत आहे. आज ते असते तर त्यांना मुलाचा अभिमान वाटला असता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 1:08 am