भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन दिल्ली आणि इतर शहरांमध्ये जोर धरू लागल्यानंतर देशातील बदललेल्या स्थितीचा अंदाज बांधण्यात यूपीए सरकार अपयशी ठरल्याची कबुली केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. सन २०१० आणि २०११ मध्ये भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये खदखदणाऱया असंतोषाला वाट मिळाल्यानंतर त्याचे परिणाम किती गंभीर असतील, हे समजून घेण्यात यूपीए सरकार कमी पडले आणि आता २०१४ च्या निवडणुकीत त्याचा परिणाम नक्की दिसणार आहे, असेही भाकीत चिदंबरम यांनी व्यक्त केले.
‘द इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांच्या ‘अॅंटिसिपेटिंग इंडिया – द बेस्ट ऑफ नॅशनल इंटरेस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर गुप्ता यांनी चिदंबरम यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना चिदंबरम यांनी यूपीए-२ सरकारकडून घडलेल्या चुकांची कबुलीच दिली. २००९ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने योग्य धडा घेतला नाही, असे वेगवेगळ्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते, असेही चिदंबरम म्हणाले.
चिदंबरम म्हणाले, २००९ मध्ये देशातील बंगळुरूवगळता इतर सर्व महानगरांनी आमच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिले. त्याचवेळी देशातील गरीब राज्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या योजना राबवूनही तिथे आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. गरीब राज्यांमध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या आणि तुलनेत शहरांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला याची माहिती नव्हती, असे नाही. मात्र, या आकडेवारीतून काही शिकण्यात आम्ही अपयशी ठरलो. या आकडेवारीचे विश्लेषण लक्षात घेऊन आम्ही शहरी भागांसाठी काही विशेष धोरणे आखायला हवी होती, असे चिदंबरम यांनी सांगितले.
केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी भाजपही देशातील लोकांचा बदलता मूड समजून घेण्यात अपयशी ठरल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.