लोकसभा निवडणुका याच वर्षी जाहीर होणार आहेत. त्यांची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तारखा जाहीर होण्याआधीच लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. देशातील २० राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी १०० सभा घेणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून बोध घेत आता भाजपाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सभा घेणे निश्चित केले आहे.

या सगळ्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षात त्यांच्या सरकारने केलेली कामे जनतेपुढे ठेवतील. ३ जानेवारीला पंजाबच्या जालंधर आणि गुरुदासपूरमध्ये पंतप्रधानांची रॅली आहेत. त्यानंतर सभा होणार आहे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्या वर्षातली पहिलीच सभा आहे. मात्र याकडे लोकसभेची तयारी म्हणूनच पाहिले जाते आहे.

काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना

३ जानेवारी पंजाब येथील गुरुदासपूर आणि जालंधरमध्ये रॅली

४ जानेवारी मणिपूर आणि आसाम या ठिकाणी रॅली

५ जानेवारी झारखंड आणि ओदिशा या ठिकाणी रॅली

२२ जानेवारी वाराणसीमध्ये रॅली

२४ जानेवारी प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्यात हजेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतर रॅली आणि सभांच्या तारखा नंतर जाहीर होणार. २०१४ मध्ये ज्या जागांवर चांगलं यश मिळालं नाही त्या जागा काबीज करण्याचा भाजपाचा विचार आहे. त्याच अनुषंगाने मोदींच्या शंभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आता याचा परिणाम कसा होतो? विरोधक या रणनीतीविरोधात त्यांची काय रणनीती आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.