केरळ विधानसभेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकूण २०२ उमेदवार करोडपती आहेत तर ३११ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असल्याचे घोषित केले आहे, असे एका पाहणीत आढळून आले आहे.
एकूण ११२५ उमेदवारांपैकी २०२ करोडपती असून काँग्रेसचे ४३, माकपचे २४, भाजपचे १८, बीडीजेएसचे १८, अभाअद्रमुकचे दोन, आययूएमएलचे १७, केरळ काँग्रेस (एम)चे नऊ आणि ३० अपक्षांनी आपली मालमत्ता एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे. सरासरी मालमत्ता १.२८ कोटी रुपये इतकी आहे.
एकूण ११२५ उमेदवारांपैकी ३११ जणांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे, त्यामध्ये माकपचे ७२, भाजपचे ४२, काँग्रेसचे ३७, बीडीजेएसचे १३, भाकपचे १५, आययूएमएलचे सहा, एसडीपीआयचे २५ आणि ४३ अपक्षांचा समावेश आहे.

एकूण उमेदवारांपैकी ४९६ जणांनी पॅनचा तपशील दिलेला नाही तर ८३४ जणांनी प्राप्तिकर तपशील दिलेला नाही तर ६९९ उमेदवार इयत्ता पाचवी ते १२ वी उत्तीर्ण आहेत तर ३८० जणांनी पदवीधर असल्याचे म्हटले आहे. सात उमेदवारांनी आपण निरक्षर असल्याचे नमूद केले आहे.

मोदींविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार – चंडी
कोची: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळची तुलना सोमालियाशी केल्याचा मुद्दय़ावरून मुख्यमंत्री उम्मन चंडी यांनी टीकेचा रोख कायम ठेवला आहे. मोदी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा सरकारचा विचार असल्याचे चंडी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी केरळी जनतेचा अपमान केल्याचा आरोप चंडी यांनी केला. याप्रकरणी त्यांनी माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. तर केरळमध्ये भाजपची सत्ता येणार नाही त्यामुळे सोमालियाप्रमाणे परिस्थिती उद्भवणार नाही, असा टोला माकपने लगावला आहे.