रिपब्लिकन बालेकिल्ल्यात डेमोक्रॅटिक पक्षाला ७० वर्षांत दुसरे यश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी अ‍ॅरिझोनातील निवडणूक कमी मताधिक्याने जिंकली आहे. राज्यातील  ११ प्रतिनिधी मते त्यांना मिळाली असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांनी निर्णायक विजय मिळवला.  डेमोक्रॅटिक पक्षाला सात दशकांत अ‍ॅरिझोनामध्ये मिळालेला हा दुसरा विजय आहे. एकेकाळी तो रिपब्लिकनांचा बालेकिल्ला होता.

मतमोजणी ३ नोव्हेंबरला सुरू  झाल्यानंतर नवव्या दिवशी अ‍ॅरिझोनाचा निकाल लागला आहे. राज्यातील ११ प्रतिनिधी मते बायडेन यांना मिळाल्याने आता २९०-२१७ असे प्रातिनिधिक मतांचे बलाबल आहे. बायडेन यांना अ‍ॅरिझोनात ११००० मतांनी म्हणजे ०.३ टक्क्य़ांच्या फरकाने विजय मिळाला आहे. १९९६ मध्ये अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अ‍ॅरिझोनातून विजय मिळवला होता असे दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. बायडेन यांनी तीनशे मतांच्या दिशेने घोडदौड सुरू ठेवली आहे. अ‍ॅरिझोनात १९९६ नंतर डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळाला नव्हता. हिलरी क्लिंटन यांचा २०१६ मध्ये ट्रम्प यांनी अ‍ॅरिझोनात पराभव केला होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय हा मॅरीकोपा भागातील मतदानामुळे झाला आहे. अ‍ॅरिझोनात १९४८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे हॅरी ट्रमन यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर १९९६ मध्ये बिल क्लिंटन व आता बायडेन यांनी विजय संपादन केला. बहुमतासाठी ५३८ पैकी २७० मते आवश्यक असतात, ती बायडेन यांना आधीच मिळाली असल्याने त्यांना माध्यमांनी विजयी जाहीर केले.

ट्रम्प यांचा गैरप्रकारांचा दावा सुरक्षा अधिकाऱ्यांना अमान्य

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फसवणूक करण्यात आल्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा अमेरिकेच्या निवडणूक सुरक्षा अधिकाऱ्यांनी सपशेल फेटाळला आहे. अमेरिकेच्या इतिहासामध्ये २०२०ची अध्यक्षीय निवडणूक अत्यंत सुरक्षित पद्धतीने घेण्यात आली असून फसवणूक करण्यात आल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही, असे शुक्रवारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रिपब्लिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने फसवणूक झाल्याचा दावा करीत असून त्यांनी अद्यापही पराभव मान्य केलेला नाही. डेमोकॅट्रिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ज्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक जिंकली त्या निवडणुकींना ट्रम्प यांनी कायदेशीर आव्हान दिले आहे.

मतदान यंत्रणेतून मते वगळण्यात आली, मतांमध्ये बदल करण्यात आला, असा कोणताही पुरावा आढळलेला नाही, असे या निवडणुकीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या दोन समित्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ज्या राज्यांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली तेथील प्रत्येक मताची नोंद आहे, असेही समितीमधील सदस्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला असून गैरप्रकारांचा एकही पुरावा सादर केलेला नाही. तरीही त्यांनी कायदेशीर आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली आहे.