नीती आयोगाने दिलेल्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत देशभरातील २१ शहरांमधील भुगर्भातील पाण्याची पातळी पूर्ण खालावणार आहे. तर २०३० पर्यंत पिण्याच्या पाण्याची वाणवा असणार आहे. यामध्ये दिल्ली, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. १० कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्याला मौताद असेल.

चेन्नईत तर आत्तापासूनच भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नईमधील अनेक हॉटेल, हॉस्टेल्स आणि कार्यालय पाण्याची कमतरता असल्याने बंद करण्यात आली आहेत. पाण्याची मुबलक जल संसाधने उपलब्ध असतानाही तसंच मुबलक प्रमाणात पाऊस झाला असतानाही चेन्नईत नद्या कोरड्या पडल्या आहेत.

पाणीटंचाईमुळे देशभरातील अनेक शहरं आणि गावं सध्या त्रस्त आहेत. एकीकडे गावांमध्ये लोकांना पाण्यासाठी अनेक मैल चालावं लागत असून, शहरांत लोकांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत.

बंगळुरुत आयटीमध्ये काम करणाऱ्या रत्नेश याने पाणीटंचाईला कंटाळून नोकरी आणि शहर दोन्ही सोडलं आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरुलाही पाणीटंचाईचा फटका बसला आहे. शहरातील लोकांना याआधी वाहतूक कोंडीची समस्या जास्त भीषण वाटत होती. मात्र सध्या पाणीटंचाई त्याहूनही भीषण ठरत आहे.

राष्ट्रील जल अकादमीचे माजी संचालक प्रोफेसर मनोहर खुशलानी यांनी सांगितल्यानुसार, चेन्नई समुद्रातील पाण्यावर प्रक्रिया करण्यावर अवलंबून आहे. मात्र ही प्रक्रिया खूप महाग आहे. पृथ्वीला मर्यादा आहे हे ते विसरत आहेत. समुद्रही एक दिवस कोरडे पडतील. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करणे हा पर्याय नसून, पाण्याची साठवणे करणे आहे.

गतवर्षी शिमला येथेही पाण्याची कमतरता भासली होती. परिस्थिती इतकी भीषण होती की, एक बादली पिण्याचं पाणी मिळावं यासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत होतं. प्रभावी लोकांमुळे परिस्थिती इतकी वाईट झाली होती की, स्थानिकांनी सोशल मीडियावर पर्यटकांना येऊ नका असं आवाहन करणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले होते.

पाणी व्यवस्थापन तज्ञ राजेंद्र सिंह यांनी सांगितल्यानुसार, ‘भुगर्भातील पाण्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर, नियोजन न करता करण्यात आलेलं बांधकाम, विकासाच्या नावाखाली करण्यात आलेला विकास आणि पाण्यासंबंधी नसलेली कोणतीही व्यवस्थापना या परिस्थितीसाठी जबाबदार आहे. सरकारने जल संसाधनांचा होणारा दुरुपयोग थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे’.

पाणी टंचाईची ही परिस्थिती भविष्यकाळात अजून भीषण होण्याची शक्यता आहे. यावर तात्काळ तोडगा काढला नाही तर यापुढे देशासमोर पाणी ही सर्वात मोठी समस्या असेल ही शक्यता नाकारु शकत नाही.