पाकिस्तानी लष्कराने यावर्षी शस्त्रसंधीचे २०५० वेळा उल्लंघन केले असून त्यात २१ भारतीय ठार झाले, अशी माहिती परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने रविवारी दिली.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले, की पाकिस्तानने सीमेपलीकडून दहशतवादी घुसवण्यासाठी नेहमीच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्या वेळी करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय नागरिक मारले गेले. अनेकदा सीमेवरील छावण्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या वर्षी एकूण २०५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून त्यात २१ भारतीय मारले गेले आहेत. भारताने २००३ मधील शस्त्रसंधीचे पालन करण्याचे आवाहन अनेकदा पाकिस्तानला केले, पण त्यांनी शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करणे सुरूच ठेवले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशात शस्त्रसंधी करार करण्यात आला होता. भारतीय सैन्य दलांनी मात्र  वेळोवेळी संयम पाळला असून अनेकदा पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरही दिले आहे. पाकिस्तानने गोळीबाराच्या माध्यमातून दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्नही  केला आहे.