कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एका गजबजलेल्या बाजारपेठेत घडविण्यात आलेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात २१ जण ठार झाले असून अन्य ५० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याद्वारे शिया हजारा वांशिक अल्पसंख्य समाजाला लक्ष्य करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

क्वेट्टातील हजारगंज या घाऊक बाजारपेठेत सकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमाराला हा स्फोट घडविण्यात आला. हजारा आणि अन्य व्यापारी दररोज या ठिकाणी फळे आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. ट्रकमधून फळे आणि भाजीपाला उतरविण्यात येत असताना हा स्फोट घडविण्यात आला आणि हजारा वांशिक समाजाला लक्ष्य करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

मसूदबाबत चीनला निर्वाणीचा इशारा

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सकडून चीनवर दबाव वाढविण्यात आला आहे. चीनने याबाबत २३ एप्रिलपर्यंत सकारात्मक भूमिका घ्यावी, असा निर्वाणीचा इशाराही चीनला देण्यात आला आहे. मसूदप्रकरणी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेतील सर्व सदस्य देशांचा पाठिंबा आहे, केवळ चीननेच नकाराधिकाराचा वापर करून यामध्ये अडथळा आणला आहे. चीनने तांत्रिक मुद्दय़ांद्वारे या प्रक्रियेमध्ये बाधा आणू नये, असे ब्रिटन आणि फ्रान्सने चीनला सांगितले आहे. यूएनएससीची १२६७ र्निबध समिती येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा परिषदेत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी नव्याने प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे.