पंजाबमधील तीन जिल्ह्य़ांत विषारी दारू पिऊन २१ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांनी या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमृतसर, बाटला आणि तर्ण तारण जिल्ह्य़ात गेल्या ४८ तासांत विषारी दारू प्यायल्याने २१ जण दगावल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी संध्याकाळी अमृतसर जिल्ह्य़ातील मुच्चल आणि तांग्रा गावात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुच्चलमधील एका संशयित आरोपीस अटक करण्यात आल्याचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. मुच्चल गावातील आणखी दोघांचा गुरुवारी संध्याकाळी संशयास्पद मृत्यू झाला. तर तांग्रा गावातील आणखी एकाचा अमृतसरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापाठोपाठ मुच्चल गावातील आणखी दोघांचा आणि बाटला जिल्ह्य़ातील दोघांचा विषारी दारूने बळी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाटला शहरात शुक्रवारी पाच जण दगावल्याने तेथील दारूबळींची संख्या सात झाली. तर तर्ण तारणमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.

सॅनिटायझरने १० मद्यपींचा मृत्यू

अमरावती : दारू मिळत नसल्याने सॅनिटायझर प्यायल्याने आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्य़ात १० जणांचा मृत्यू झाला. त्यांत तीन भिक्षेकऱ्यांचा समावेश आहे. प्रकासम जिल्ह्य़ातील कुरिचेडू गावात टाळेबंदी लागू आहे. दारूची दुकाने बंद असल्याने मद्यपी काही दिवसांपासून पाणी आणि शीतपेयांतून सॅनिटायझर पीत होते.