राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची (एनएफएसए) अंमलबजावणी आणखी १० राज्यांमध्ये येत्या १ एप्रिलपासून केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी येथे सांगितले. यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची संख्या २१ होणार आहे, असे ते म्हणाले. आपण मंत्री झालो तेव्हा केवळ ११ राज्यांमध्येच या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली होती आणि तीही पूर्णपणे करण्यात आली नव्हती. मात्र आता ११ वरून ही संख्या २१ वर पोहोचली असल्याचे पासवान म्हणाले. गुजरातमध्ये १ एप्रिलपासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गुजरात सरकारने घेतलेल्या परिश्रमांची पासवान यांनी या वेळी स्तुती केली.