जगात सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात विविध प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत असतात. याचा विकासावरही परिणाम होतो. श्रीमंत-गरीब ही दरीही दिसून येते. मात्र, एका अहवालात नवीन माहिती समोर आली आहे. भारतातील ११९ अब्जाधिशांच्या संपत्तीत दररोज तब्बल २२०० कोटी रुपयांची भर पडत आहे. गेल्या वर्षात १ टक्का असलेले हे अब्जाधीश आता ३९ टक्क्यांनी अधिक श्रीमंत झाले आहेत. तर अर्थिकरित्या कमकुवत असलेल्यांच्या संपत्तीत फक्त तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे २००४ पासून देशातील सर्वाधिक गरीब असलेल्या १३.६ कोटी लोक कर्जात बुडाले आहेत. ‘ऑक्सफॉम’ने अर्थव्यवस्थेतील श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढत्या दरीवर आधारित ‘पब्लिक गुड ऑर प्रायव्हेट वेल्थ’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही बाब समोर आली आहे.

ऑक्सफॉमच्या वतीने दरवर्षी अर्थव्यवस्थेतील असमानतेवर अहवाल प्रकाशित होत असतो. काही मोजक्या अब्जाधिशांकडे देशाच्या संपत्तीतील मोठा वाटा आहे. गरिबांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. आपल्या आजारी मुलांना औषधे देण्याइतपतही त्यांच्याकडे पैसे नाहीत. ही अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे ऑक्सफॉम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बहर यांनी म्हटले आहे.

जर ही असमानता अशीच राहिली तर देशाची लोकशाही आणि सामाजिक व्यवस्था ढासळू शकते, असा इशाराही अमिताभ बहर यांनी दिला आहे. भारताच्या संपत्तीत असमानता वाढत असल्याचा उल्लेख ऑक्सफॉमने आपल्या अहवालात केला आहे. २००८ मध्ये भारतातील संपत्तीतील असमानतेचे प्रमाण हे ८१.२ टक्के इतकी होती. तेच प्रमाण २०१८ मध्ये ८५.४ इतके झाले आहे.

वाढती असमानता देशासाठी धोकादायक आहे. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते. दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पूर्वसंध्येला ऑक्सफॉमच्या वतीने वार्षिक अहवाल सादर केला जातो. अत्यंत अचूक तारीख आणि माहितीसह हा अहवाल तयार केला जातो, असा दावाही ऑक्सफामच्या वतीने केला जातो.

देशातील अब्जाधीशांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. ११९ जणांच्या यादीत १८ नवी नावे आली आहेत. यातील १५ अब्जाधीश हे कन्झ्युमर गुड्स उद्योगातील, १५ फार्मास्युटिकल क्षेत्रातील आहेत. महिला अब्जाधिशांच्या बाबतीतही भारतात असमानता दिसून येते. अवघ्या ९ महिलांचा अब्जाधिशांच्या यादीत समावेश होतो. अब्जाधिशांच्या संपत्तीने ४०० अब्ज डॉलरचा टप्पाही पहिल्यांदाच ओलांडला आहे.