केनियाच्या किनाऱ्यावर दोन परगण्यात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात २२ जण ठार झाले. गेल्या महिन्यात अल कायदाशी संबंधित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात या ठिकाणी ६५ जण ठार झाले होते, असे केनिया रेड क्रॉसने सांगितले. आजचा हल्ला हा लामू परगण्यातील हिंदी व ताना रिव्हर परगण्यातील गांबा येथे झाला असे केनिया रेड क्रॉसचे प्रमुख अब्बास गुलेट यांनी सांगितले. अल कायदाशी संबंधित सोमालियाच्या अल शबाब अतिरेक्यांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
लामू परगण्याचे आयुक्त निजेन्गा मायरी यांच्या मते पंधरा बंदूकधाऱ्यांच्या एका गटाने हिंदी गावातील मलामंदी खेडय़ात छापे टाकले व रहिवाशांवर गोळीबार केला. बंदूकधाऱ्यांनी गांबा पोलीस ठाण्यावर हल्ला केला, असे केनियाचे पोलीसप्रमुख डेव्हिड किमायो यांनी सांगितले. हिंदी हे गाव पेकेटोनी पासून ४० कि.मी. अंतरावर आहे, जिथे गेल्या महिन्यात हल्ला झाला होता, तर गांबा हे ठिकाण पेकेटोनीच्या वायव्येस ७० कि.मी. अंतरावर आहे. केनिया रेडक्रॉसने म्हटले आहे, की हिंदी गावात नऊ जण मरण पावले आहेत, तर गांबा येथे नऊ जण मरण पावले आहेत. एक जण बेपत्ता आहे. गांबा येथे नऊ मृतांपैकी पाच मुस्लिमेतर आहेत.