बागलकोट -बेळगाव राज्य महामार्गावर हलकी क्रॉस येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात २२ मजूर ठार तर १४ जखमी झाले. हा भीषण अपघात शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास झाला. मृतांमध्ये ७ मुले व १० महिलांचा समावेश आहे. सर्व मृत कर्नाटकमधील सुरपूर (जि. यादगिरी) येथील रहिवासी होत़े  मजुरी कामासाठी ते सावंतवाडीला जात होते.
सुरपूर येथील लमाणी तांड्यांवरील ५१ मजूर सावंतवाडी येथे रोजगारासाठी चालले होते. बेळगावपासून सुमारे ५० किमी अंतरावरील हलकी क्रॉसजवळ कडेच्या दिशादर्शकाला धडक दिल्याने टेम्पो उलटल्याने हा अपघात झाला़  रात्रभर सलग टेम्पो चालविल्याने चालकाला थकवा आला होता. त्यामुळे त्याला ग्लानी आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. जखमींना मुरगोड, चचडी आणि बलहोंगलच्या तसेच बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. चंद्रगुप्त व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. मृताच्या नातेवाईकांना कर्नाटक राज्य सरकारने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती साखर खात्याचे मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी अपघातस्थळी प्रसामाध्यामांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.