जग वेगाने डिजिटल होताना दिसत आहे. एकेकाळी सर्व व्यवहार रोख रकमेने होत असत. पण आता क्रेडिट आणि डेबिट कार्डचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे. सरकारही डिजिटल इंडिया अभियान सुरू करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी कुणी बँकेत खाते नसलेला व्यक्ती सापडेल अशी कल्पनाही कोणी करू शकणार नाही. परंतु, वास्तव हे आहे की, बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेली दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या भारतात आहे. जागतिक बँकेने जारी केलेल्या अहवालानुसार, भारताचे सुमारे १९ कोटी वयस्कर व्यक्तींचे कोणत्याच बँकेत खाते नाही. यामध्ये चीन आघाडीवर आहे. दरम्यान, देशातील खातेधारकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष २०११ मधील ३५ टक्क्यांवरून २०१७ मध्ये ८० टक्के इतकी वाढ झाली आहे.

जागतिक बँकेने जारी केलेल्या वैश्विक फाइंडेक्स अहवालात म्हटले आहे की, भारतात आर्थिक सुधारणा वेगाने होत आहेत. खातेधारकांची संख्या २०११ मध्ये ३५ टक्के होती ती २०१४ मध्ये ५३ टक्के इतकी झाली. तर आता २०१७ मध्ये ती ८० टक्के झाली. देशातील ८० टक्के लोकांनी बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला असला तरी लोकसंख्येचा मोठा भाग अजूनही बँकिंग सेवेपासून दूरच आहे. चीनमध्ये तर अशा लोकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. चीनमध्ये २२.५ कोटी वयस्कर लोक बँकिंग सेवेपासून वंचित आहेत. तर भारतात हा आकडा १९ कोटी इतका आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये १० कोटी आणि इंडोनेशियामध्ये ९.५ कोटी लोकसंख्या बँकिंग सेवेपासून लांब आहे.

जगभरातील १.७ अब्ज वयस्कर बँकिंग सेवेपासून वंचित आहेत. अशा लोकांचे कोणत्याही बँक किंवा आर्थिक संस्थांमध्ये खाते नाही. भक्कम अर्थव्यवस्था असलेल्या देशात बँक खाते नसलेली व्यक्ती सापडणे कठीण आहे. बँकिंग सेवेपासून विकसनशील देशातील लोकसंख्याच दूर असल्याचे दिसून येते. ज्यामध्ये चीन, भारत, बांगलादेश, इंडोनेशिया, मेक्सिको, नायजेरिया आणि पाकिस्तानचा समावेश होतो.

जागतिक बँकेच्या मते, भारत सरकारच्या जन धन योजनेमुळे देशातील खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, जनधन खातेधारकांची संख्या वर्ष २०१७ च्या मार्च महिन्यात २८.१७ कोटी होती. जी २०१८ मध्ये वाढून ३१.४४ कोटी झाली. देशात २०१५ च्या मार्च महिन्यात एकूण चालू आणि बचत खात्यांची संख्या १२२.३ कोटी होती. जी २०१७च्या मार्च महिन्यात वाढून १५७.१ कोटी इतकी झाली. यामध्ये लिंगभेदही कमी झाला असून ८३ टक्के पुरूष आणि ७७ टक्के महिलांचे बँकेत खाते आहेत.