दिल्लीमधील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या २२ हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सह-सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे. तसंच तबलिगी जमातशी संबंधित रुग्ण १७ राज्यांमध्ये सापडले असून अद्यापही ट्रेसिंग सुरु आहे. कार्यक्रमाशी संबंधित १०२३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. हे आमच्यासाठी रोज एका युद्धाप्रमाणे असून एकही व्यक्ती सोडली जाऊ शकत नाही. देशवासियांनीही आम्हाला यामध्ये सहकार्य केलं पाहिजं असं आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

करोनासंबंधी सध्या देशात काय परिस्थिती आहे याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. “सध्या देशात एकूण २९०२ करोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात करोनाचे ६०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत मृतांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. दरम्यान १८३ जणांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,” अशी माहिती लव अग्रवाल यांनी यावेळी दिली.

करोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९ टक्के रुग्ण ० ते २० वयोगटातील आहेत. तर ४२ टक्के रुग्ण २१ ते ४० वयोगटातील आहेत. ४१ ते ६० वयोगटातील रुग्णांची संख्या ३३ टक्के असून ६० च्या पुढील रुग्णांची संख्या १७ टक्के असल्याचं लव अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं.

पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी यावेळी लॉकडाउनची योग्य अमलबजावणी केली जात असून जीवनाश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा होत असल्याचं सांगितलं आहे. “राज्य सरकार, स्वयंसेवी संस्थां आणि इतरांच्या सहाय्याने स्थलांतर करणाऱ्या कामगारांना सुविधा, डोक्यावर छत पुरवलं जात आहे. तसंच आपत्ती व्यवस्थापनासाठी ११ हजार ९२ कोटींचा निधी सर्व राज्यांना देण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारं स्थलांतरित कामगार आणि आपत्ती व्यवस्थापनचा खर्च उचलू शकतं. गृह मंत्रालय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

आपण दोन महिन्यांपूर्वी दोन लॅबपासून सुरुवात केली होती. पण नंतर आपण त्यांची संख्या वाढवली. आज देशात एका दिवसात १० हजाराहून जास्त चाचण्या होत आहेत अशी माहिती यावेळी लव अग्रवाल यांनी दिली.