भारत आणि रशिया यांच्यात सोमवारी झालेल्या विस्तृत चर्चेनंतर २२ हजार कोटींच्या संरक्षण करारासह अन्य १० प्रमुख करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेत विविध मुद्दय़ांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अणुऊर्जेसह द्विपक्षीय सहकार्य, व्यापार, गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश, पर्यटन आदींचा समावेश होता. कुडनकुलम् येथे तिसरी आणि चौथी अणुभट्टी उभारण्याचा करार करण्यासंबंधीही उभय नेत्यांनी विचारविनिमय केला.
‘सिस्टेमा’ या प्रमुख रशियन दूरसंचार कंपनीचा परवाना रद्दबातल ठरविण्याच्या मुद्दय़ावरही मनमोहन सिंग आणि पुतीन यांनी चर्चा केली. परंतु त्या चर्चेचा तपशील सांगण्यात आला नाही. ‘सिस्टेमा’ कंपनीत रशियन सरकारचे १७.१४ टक्के भागभांडवल आहे. भारतातील ‘श्याम सिस्टेमा टेलिसव्र्हिसेस लि.’ या कंपनीत ‘सिस्टेमा’ या कंपनीची ३.१ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक असून स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी रोजी ज्या कंपन्यांचे परवाने रद्दबातल केले होते, त्यामध्ये ‘श्याम सिस्टेमा’ चाही समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रशिया सरकार चिंताग्रस्त झाले होते आणि ‘श्याम सिस्टेमा’ कंपनीतील ‘सिस्टेमा’ कंपनीच्या गुंतवणुकीचे रक्षण कसे होईल, याची काळजी भारताने घ्यावी, असा आग्रह रशियाने धरला होता. या मुद्दय़ावर उभय नेत्यांची सोमवारी चर्चा झाली. दरम्यान, राजधानीत अलीकडेच झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पुतीन आणि मनमोहन सिंग यांच्यात हैदराबाद येथे चर्चा न होता ही चर्चा ७, रेसकोर्स येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडली.
काय म्हणाले पंतप्रधान?
पुतीन आणि मनमोहन सिंग यांच्यात अन्य विषयांसह आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवरही चर्चा झाली. अफगाणिस्तान स्थिर, लोकशाहीवादी आणि संपन्न असावा, यावर भारत आणि रशियाचे एकमत झाले, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील विद्यमान घडामोडींचा आम्ही आढावा घेतला, असे ते म्हणाले. दहशतवादी विचारसरणी तसेच अमली पदार्थाच्या तस्करीविरोधात उपाययोजना करण्यावरही आम्ही भर दिल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले. औषधे, खतपुरवठा, खाणकाम, पोलाद उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान, नागरी हवाई उड्डाण, अन्न प्रक्रिया, आदी क्षेत्रांमध्येही उभय देशांना व्यापक सहकार्याच्या उत्तम संधी आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 4:35 am