देशातील करोना रुग्णांची संख्या ७ लाख ४२ हजार ४१७ झाली असून, गेल्या चोवीस तासांमध्ये २२ हजार ७५२ नवे रुग्ण आढळले आहेत, तर, ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये १५ हजार ५१५ रुग्ण करोनामुक्त झाले असून, एकूण ४ लाख ३९ हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ६१.१३ टक्के आहे. २ लाख ५९ हजार ५५७ रुग्ण उपचाराधीन आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार ३९०ने अधिक आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना प्रतिदिन करोनाच्या नमुना चाचण्या वाढवण्याची सूचना केली आहे. आरटी-पीसीआर चाचणी तसेच, जलद रक्तद्रव चाचणीही केली जात आहे.

राज्यांतील डॉक्टरांना ‘एम्स’चा सल्ला..

दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातील तज्ज्ञांकडून विविध राज्यांतील डॉक्टरांना सल्ला देण्यात येत असून, बुधवारी झालेल्या पहिल्या सत्रामध्ये १००० खाटा असलेली १० आरोग्य सेवा केंद्रे व रुग्णालये सहभागी झाली. यामध्ये नऊ मुंबईतील व १ गोव्यातील होते.

मुंबईतील नेस्को केंद्र, सिडको मुलुंड, मालाड इन्फिनिटी मॉल, जिओ कन्व्हेन्शन केंद्र, नायर रुग्णालय, एमसीजीएम सेव्हन हिल्स, एमएमआरडीए बीकेसी १ व २, मुंबई मेट्रो दहिसर केंद्र आणि जीएमसी पणजीतील डॉक्टर सहभागी झाले.

दहा लाखांमागे ३१५ रुग्ण बरे

भारतात दहा लाख लोकसंख्यामागे ३१५ रुग्ण करोनामुक्त झाले असून १८६ रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्रात हे प्रमाण अनुक्रमे ८६९ व ६६१, दिल्लीत ३४९७ व १२४२, तमीळनाडू ७५३ व ५२९, हरियाणा ४८० व १४०, गुजरात ३५८ व ११५, राजस्थान २१७ व ५२, मध्य प्रदेशमध्ये १४४ व ३८, ओडिशात १४१ व ६५ आणि उत्तर प्रदेशमध्ये ८५ व ३८ असे आहे. सध्या देशभरात १,२०१ करोना विशेष रुग्णालये असून २,६११ करोना आरोग्यसेवा केंद्रे व ९,९०९ करोना सेवा केंद्रे कार्यरत आहेत.

राज्यात ६,६०३ नवे बाधित

राज्यात गेल्या २४ तासांत ६,६०३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९८ जणांचा मृत्यू झाला. पुण्यात हजारांपेक्षा जास्त, तर कल्याण-डोंबिवलीत ५०० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले. राज्यातील एकूण करोनाबाधितांची २ लाख २३ हजारांवर पोहोचली आहे.