News Flash

उत्तर प्रदेश: दोन ट्रकचा भीषण अपघात; २३ मजूर जागीच ठार

रात्री साडेतीनच्या सुमारास झाला अपघात

उत्तर प्रदेश: दोन ट्रकचा भीषण अपघात; २३ मजूर जागीच ठार
फोटो सौजन्य: एएनआय

लॉकडाउन सुरु असल्याने घराकडे निघालेल्या २३ मजुरांचा उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यापैकी एका ट्रकमध्ये ८१ मजूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी २३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

“रात्री साडेतीनच्या सुमरास हा अपघात घडला. २३ जणांचा मृत्यू झाला असून १५ ते-२० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकजण हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील रहिवाशी आहेत,” अशी माहिती औरैयाचे जिल्हाधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व मजूर राजस्थानवरुन आपल्या राज्यांमध्ये जात होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून जखमींना तात्काळ मदत पुरवण्याचे आदेशही दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन अपघात नेमका कशामुळे झाला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश योगी यांनी दिले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनिश अवस्थी यांनी दिली आहे.

तर औरैयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अर्चना श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. १५ गंभीर जखमी रुग्णांना सैफिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्व मजूर हे राजस्थानवरुन बिहार आणि झारखंडला जात होते.

मागील काही आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ८ मे रोजी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये १६ मजुरांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. मध्य प्रदेशमध्ये ९ मे रोजी झालेल्या अपघातामध्ये नरसिंगपूर जिल्ह्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 8:11 am

Web Title: 23 migrants killed in road accident in uttar pradeshs auraiya scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार – डोनाल्ड ट्रम्प
2 शेतमालासाठी देशव्यापी एकच बाजारपेठ
3 टाळेबंदीचा चौथा टप्पा अधिक शिथिल?
Just Now!
X