विषारी अन्नपदार्थ खाल्ल्याने राजस्थानात दोन ठिकाणी २३ मोर मृतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. टोंक जिल्ह्य़ातील नागरफोर्ट परिसरात मोरांचे १७ सांगाडे आढळले असून, त्यापैकी पाच नर तर १२ माद्या आहेत.
मकराणा शहरातील बारवाला गावातील वनक्षेत्रात आणखी सहा मोर मृतावस्थेत आढळले. विषारी अन्नपदार्थ खाल्ल्याने या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अन्नपदार्थाचे नमुने गोळा करण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
मोरांच्या सांगाडय़ांची तपासणी केल्यानंतर ते पुरण्यात आले आणि वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. राजस्थानमधील दोन ठिकाणी राष्ट्रीय पक्षी मृतावस्थेत आढळणे हा वन आणि पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचे सिद्ध होते, असे बी. एल. जाजू या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जबाबदारी निश्चित करण्यासाठी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी विनंती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना करण्यात आली आहे. राज्यात दररोज सरासरी १० मोरांची शिकाऱ्यांकडून शिकार केली जाते, तरीही वन आणि पोलीस खाती शांतपणे त्याकडे पाहात बसतात, असेही जाजू यांनी म्हटले आहे.