पाकिस्तानच्या दुतावासातून २३ भारतीय पासपोर्ट ‘गायब’ झाल्याने भारतातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यालयातून हरवलेले सर्व पासपोर्ट हे शीख भाविकांचे असून हे शीख भाविक गेल्या महिन्यात यात्रेनिमित्त पाकमध्ये गेले होते. पासपोर्ट हरवलेल्या शीख भाविकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आता ते पासपोर्ट रद्द करण्याची तयारी सुरु केली असून हे प्रकरण पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसमोरही मांडले जाणार आहे.

पाकिस्तानकडून २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ३, ८०० शीख भाविकांना व्हिसा मंजूर करण्यात आला होता. गुरुनानक यांच्या ५४९ व्या जयंतीनिमित्त हे व्हिसा जारी करण्यात आले होते.  ३, ८०० पैकी २३ जणांनी पोलिसांकडे पासपोर्ट हरवल्याची तक्रार दिली आहे. पाकिस्तानने या मागे त्यांच्या देशातील अधिकाऱ्यांचा हात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शीख भाविकांकडून एका एजंटने हे पासपोर्ट घेतले होते. एजंट हा दिल्लीतील असून व्हिसासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे कागदपत्र सादर करण्यासाठी त्याने पासपोर्ट हवे असल्याचे सांगितले होते. एजंटने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानच्या दुतावासात जमा केली होती. तो पासपोर्ट घेण्यासाठी तिथे गेला असता दुतावासातील कर्मचाऱ्यांनी कागदपत्रेच मिळालेली नाही, असे सांगितल्याचा दावा त्याने केला.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे. ‘हा गंभीर प्रकार असून पासपोर्टचा गैरवापर होऊ नये, यावर आमचा भर आहे’, असे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.