देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. सध्या लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरू असला तरी सरकारनं अनेक बाबींमध्ये मोठी सुट देत लॉकडाउन उठवण्यासही सुरूवात केली आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प होते. अशा परिस्थितीत काही मजुरांनी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी पायी वाट धरली होती. अनेक ठिकाणी श्रमिक मजूर आपल्या कुटुंबासह मूळ गावी जात असल्याचं चित्रही आपल्याला पाहायला मिळालं होतं. अशातच एक दु:खद घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय प्रवासी मजुरानं १२ दिवसांमध्ये बंगळुरू ते उत्तर प्रदेश असा २ हजार किलोमीटरचा पायी प्रवास करत आपलं घर गाठलं. परंतु घरी पोहोचल्यानंतर त्यांला सर्पदंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील सलमान खान नावाच्या एका तरूणानं बंगळुरू ते उत्तर प्रदेशातील आपल्या घरापर्यंत असा तब्बल २ हजार किलोमीटरचा प्रवास केला. घरी पोहोचल्यानंतर त्यानं आपल्या आईची गळाभेट घेतली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. याचदरम्यान त्याला सर्पदंश झाला. २६ मे रोजी ही घटना घडली. डोळ्यात तेल ओतून आपल्या मुलाची वाट पाहणाऱ्या त्या आईला या घटनेनंतर मोठा धक्का बसला. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- ऑनलाइन शिक्षण घेणं शक्य नसल्याने नवव्या इयत्तेतील मुलीने संपवलं जीवन

उत्तर प्रदेशात पोहोचल्यानंतर त्याला काही दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर २६ मे रोजी तो घरी पोहोचला होता. परंतु घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी असलेल्या कंत्राटदारानं त्यांना पैसे देण्यास मनाई केली. त्यामुळं त्यानं बंगळुरू ते उत्तर प्रदेश असा पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता.