मेक्सिको सिटीच्या उत्तरेला एका शहरात आतषबाजीच्या वेळी झालेल्या स्फोटांच्या मालिकेत २४ ठार तर  इतर ४९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मृतांमध्ये अग्निशामक दलाचे चार जवान व दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असून पहिला स्फोट झाल्यानंतर लगेच ते घटनास्थळी पोहोचले होते. नंतरच्या स्फोटात ते मारले गेले. जवळच्या महामार्गावरून या स्फोटांचे चित्रण करण्यात आले असून टुल्टेपेक शहरातील स्फोटातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

पडलेल्या इमारती व खड्डे पडलेली जमीन यांचा त्यात समावेश आहे. चार लहान इमारती या स्फोटात पडल्या आहेत. मेक्सिको सरकारने म्हटले आहे की, टुल्टेपेक येथील काही लोक यात मारले गेले असून सहा आपत्कालीन कर्मचारी व इतर दोघांची अजून ओळख पटलेली नाही. मृतांचा आकडा २४ सांगण्यात आला असून मेलेले इतर लोक कोण हे  समजलेले नाही. सकाळी ९.४० वाजता पहिला स्फोट झाला. सकाळी १० वाजता तीन शक्तिशाली स्फोट झाले. त्यात आणखी काही लोक मारले गेले. अग्निशमन जवान, स्थानिक व राज्य पोलिस यांचा जखमीत समावेश आहे.

मेक्सिकोच्या राज्य नागरी सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, या वेळी सतरा मृतदेह जागीच सापडले आहेत. हेलिकॉप्टरने जखमींना हलवण्यात येत असून तीनशे पोलिस घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. नागरी संरक्षण संस्थेचे लुइस फीलीप प्युंटे यांनी सांगितले की, चार स्फोट झाले असून एका अनधिकृत कार्यशाळेत चार स्फोट झाले. जूनमध्ये झालेल्या स्फोटात याच शहरात सात ठार तर आठ जण जखमी झाले होते.