गाझियाबादच्या मुरादगनर येथे काल(रविवार) स्मशानभूमीतील छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १८ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपासाच्या आधारावर आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलेली आहे. तर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती गठीत केली गेली आहे. गाझियाबाद ग्रामीणचे पोलीस अक्षीक्षकांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, संतप्त झालेल्या या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी गाझियाबादला मेरठशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको केला आहे. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. पोलीस प्रशासन नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय, महामार्गावर मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा देखील बोलावण्यात आलेला आहे.

अंत्यसंस्कारसाठी आलेले लोकं पाऊस आल्याने एका छताखाली उभे राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळलं व ते सर्वजण त्याखाली अडकले  होते. घटनेची माहिती मिळाताच पोलीस व एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झालं होतं.

अंत्यसंस्कार करतानाच काळाने डाव साधला; स्मशानभूमीचं छत कोसळून २१ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश सरकारकडून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच, दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांव कडक कारवाई करण्याचे देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिलेले आहेत.