अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या सभेत आत्मघाती स्फोट घडवून आणल्याचे वृत्त आहे. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की यामध्ये २४ जण जागीच ठार झाले असून ३० पेक्षा अधिक लोक भीर जखमी झाले आहेत. येथील परवन शहरात राष्ट्रपतींची सभा होती.

राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या निवडणूक कॅम्पेनचे प्रवक्ते हामिद अजीज यांनी सांगितले की, “ही घटना घडली त्यावेळी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. दरम्यान, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच या संपूर्ण घटनेबाबत माहिती देण्यात येईल.”

तसेच सरकारच्या प्रवक्त्या वाहिदा शाहकर यांनी सांगितले की, “राष्ट्राध्यक्षांची सभा सुरु असताना सभा स्थळाच्या गेटवरच हा आत्मघाती स्फोट झाला. त्यानंतर येथे एकच गोंधळ उडाला. मात्र, अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.” दरम्यान, पीडी ९ शहरात अमेरिकन दुतावासाजवळ आणखी एक बॉम्बस्फोट झाला असून यात कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

अफगाणिस्तानात पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सध्या जोरात निवडणूक प्रचार सुरु आहे.