हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत (ईव्हीएम) फेरफार करण्याचे आश्वासन देऊन उमेदवारांकडून पैसे उकळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सचिन राठोड (२४) असे या तरुणाचे नाव आहे.

हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. सुमारे ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कही बजावला होता. मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार करुन विजय मिळवून देतो असे सांगत सचिन राठोडने उमेदवारांना मेसेज पाठवले होते. या मोबदल्यात त्याने १० लाख रुपयांची मागणीही केली होती. याची माहिती हिमाचल प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांच्या पथकाने पुण्यातून सचिन राठोडला अटक केल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

सचिन राठोडला कोणी पैसे दिले होते का, त्याला ईव्हीएममध्ये फेरफार करता येते की फक्त पैसे उकळण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सचिन नेमके काय करतो, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना असून काँग्रेसचे वीरभद्र सिंह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपने वीरभ्रद सिंह यांना लक्ष्य केले होते. भाजपतर्फे ७३ वर्षीय प्रेमकुमार धुमळ हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपला ४५ जागा मिळतील असा अंदाज जनमत चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे.