देशात गेल्या चोवीस तासांमध्ये २४ हजार ८७९ रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या ७ लाख ६७ हजार २९६ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा सुमारे दुपटीने (१.७५ पट) जास्त आहे.
आत्तापर्यंत ४ लाख ७६ हजार ३७६ रुग्ण बरे झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ही संख्या १९ हजार ५४७ होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६२.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे. २ लाख ६९ हजार ७८९ रुग्ण उपचाराधीन आहेत.
गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ६७ हजार ६१ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण १ कोटी ७ लाख ४० हजार ८३२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात ११३२ वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
लस लवकर विकसित होणे गरजेचे – आयसीएमआर
* भारत बायोटेक आणि कॅडिला हेल्थ केअर या दोन कंपन्या लस विकसित करत आहेत. लसीच्या घातकपणाची चाचणी प्राण्यांवर घेण्यात आली आहे. आता मानवी चाचणीसाठी टप्पा १ व २ साठी या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. कुठल्या रुग्णालयांमध्ये मानवी चाचणी करायची हेही निश्चित करण्यात आले आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावर ते जाहीर केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) राजेश भूषण यांनी दिली.
* भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने मानवी चाचणीसाठी रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रामागे लसीच्या मानवी चाचण्यांना गती दिली जावी एवढाच हेतू होता. काळाची गरज ओळखून लस लवकरात लवकर विकसित झाली पाहिजे. पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करून लस विकसित करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला तर त्याचा उपयोग होणार नाही. संशोधनाच्या मान्यताप्राप्त प्रक्रियेला बगल न देता वेगाने मानवी चाचण्या व्हाव्यात असा दृष्टिकोन असल्याचे ‘आयसीएमआर’च्या निवेदिता गुप्ता यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 12:42 am