नाइटक्लबला लागलेल्या आगीत ब्राझीलमधील सांता मारिया शहरात रविवारी पहाटे २४५ हून अधिक मृत्युमुखी पडले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
किस नाइटक्लबमध्ये शनिवारी रात्रीपासून पार्टी सुरू होती. रविवारी पहाटे संगीतचमूने ज्योत पेटवण्यासाठी आगपेटी लावताच आगीचा भडका उडाला. क्लबच्या छताला प्रथम आगीच्या लोळांनी लपेटले. त्यानंतर क्षणार्धातच आगीने संपूर्ण क्लबलाच घेरले. आग लागली त्यावेळी क्लबमध्ये सुमारे ५०० जण होते. आग लागताच घबराट उडाली. जीव वाचवण्यासाठी झालेल्या धावपळीतच अनेकांचा मृत्यू झाला. रविवारी रात्रीपर्यंत २४५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यातील अनेकांच्या देहांचा कोळसा झाला होता. आगीचे रूप एवढे भीषण होते की ती विझविण्यासाठी सुमारे पाच तास लागले.