देशात करोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक रविवारी नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत करोनाचे २४ हजार ८५० रुग्ण आढळले असून, देशभरातील रुग्णसंख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत भारत हा तिसरा क्रमांक असलेल्या रशियाच्या समीप पोहोचला आहे.

देशात गेल्या २४ तासांमध्ये ६१३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १९ हजार २६८ झाली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या आता ४ लाखांपेक्षा जास्त आहे. गेल्या २४ तासांमध्ये १४ हजार ८५६ रुग्ण बरे झाले. करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन

रुग्णांपेक्षा १.६५ लाखांनी जास्त आहे. देशभरात २ लाख ४४ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढ अधिक आहे. देशात सलग नऊ दिवस रोज १८ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे.

रुग्ण बरे होण्याचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६०.७७ टक्के आहे. २१ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. देशातील ११०० वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ४८ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ९७ लाख ८९ हजार ६६  चाचण्या झाल्या आहेत.

करोनाच्या रुग्णसंख्येत जगात भारत चौथ्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिका, ब्राझील आणि रशियापाठोपाठ भारताचा क्रमांक आहे. मात्र, भारत हा रशियाच्या समीप पोहोचला आहे.

राज्यात ६५५५ रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रात रविवारी करोनाच्या ६५५५ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या दोन लाख सहा हजार ६१९ इतकी झाली आहे. रविवारी १५१ रुग्ण दगावले. राज्यातील करोनाबळींची संख्या ८८२२ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख ११ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत.