मेट्रो स्टेशनवर एका २५ वर्षीय महिला पत्रकाराचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोच्या ITO स्टेशनवर ही घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने ट्विट केले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज १३ नोव्हेंबरचे आहे. याआधी या नराधमाने आणखी २ मुलींचा विनयभंग केल्याची घटनाही उघडकीस आली आहे. पोलिसांनी या नराधमाला कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ज्या नराधमाला अटक करण्यात आली आहे तो ITO भागातील झोपडपट्टीत राहतो. तसेच चहा विक्रीचे काम करतो. त्याचे नाव अखिलेश असल्याची माहिती पोलीस अधिकारी पंकज सिंग यांनी दिली आहे. पीडित मुलगी मेट्रो स्टेशनचा ब्रिज चढून जात होती त्याचवेळी अखिलेश तिथे आला आणि त्याने तिचा विनयभंग केला तसेच तिला मारहाणही केली. यानंतर या मुलीने तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याआधारे पोलिसांनी अखिलेशला अटक केली.

पीडित महिला पत्रकार एका इंग्रजी दैनिकासाठी काम करते. ITO मेट्रो स्टेशनच्या पायऱ्या चढत असताना अखिलेश तिथे आला त्यानंतर त्याने माझी छेड काढली. मी जोरात आरडाओरडा केला तसेच अखिलेशला मारण्याचाही प्रय़त्न केला. तरीही तो थांबला नाही. मग मी तिथून पळाले आणि पोलिसात तक्रार दिली अशी माहिती पीडित मुलीने दिली आहे.