पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती बदलू लागल्याचं चित्र आहे. बारामुल्ला येथे नुकतीच भारतीय लष्कराने १११ जागांसाठी भरती सुरु केली असून काश्मिरी तरुणांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळालं. १११ जागांसाठी तब्बल २५०० तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली.

लष्करात भरती होण्यासाठी अर्ज करणाऱ्या एका तरुणाने सांगितलं की, ‘लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. आम्हाला नोकरीची फार कमी संधी आहे. लष्करात भरती होऊन आम्ही आमच्या कुटुंबाची सुरक्षा करु शकतो सोबत काळजीदेखील घेऊ शकतो’.

दुसऱ्या एका तरुणाने सांगितल्यानुसार, ‘आम्ही काश्मीरच्या बाहेर जाऊ शकत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आम्हाला जास्तीत जास्त नोकऱ्यांची संधी दिली जावी अशी अपेक्षा आहे. जर काश्मीरमधील जवानांना संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केलं तर ते स्थानिकांशी चर्चा करत जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात’.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी काश्मिरी विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. अनेकजण पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी विनाकारण विद्यार्थ्यांना जबाबदार ठरवताना दिसत आहेत. यादरम्यान काश्मीरमधील या तरुणांनी दहशतवाद मिटवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं दिसत आहे.