२६/ ११ दहशतवादी हल्यामध्ये दहशतवाद्यांनी वापरलेल्या पाकिस्तानी बोटीचा तपास करणे भारताला शक्य होणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह जवळपास १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. यामध्ये एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यामागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने भारतीय सुरक्षा यंत्रणेला या हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीचा तपास करण्याची परवानगी दिली आहे. ‘अल फौज’ नावाच्या बोटीतून पाकिस्तानी दहशतवादी भारतात दाखल झाले होते. ही बोट सध्या कराचीमध्ये आहे. यापूर्वी इस्लामाबाद न्यायालयाने या बोटीच्या चौकशीसाठी भारतीय सुरक्षा पथकाला नकार दिला होता. ‘अल फौज’ या बोटीतून पाकिस्तानमधील दहा दहशतवादी समुद्रमार्गाने एके ४७सह मुंबईमध्ये आले होते. यामध्ये जिवंत सापडलेल्या अजमल कसाबला पुण्यातील येरवडामध्ये फाशी देण्यात आली होती.