बांगलादेशातील शीतलाख्य नदीत मालवाहू जहाज एका लहान प्रवाशी बोटीवर आदळल्यानंतर २६ प्रवासी बुडून मरण पावले आहेत. रविवारी हा प्रकार नारायणगंज जिल्ह््यात झाला असून हे ठिकाण ढाक्याच्या आग्नेयेला १६ कि.मी. अंतरावर आहे.२१ मृतदेह नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन दल व पोलीस यांना सापडले आहेत.

ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार पाच मृतदेह रविवारीच सापडले होते. एमएल साबीत अल हासन ही प्रवासी बोट एसकेएल ३ या मालवाहू जहाजाशी झालेल्या टकरीनंतर बुडाली होती. शितलाख्य नदीत सय्यदपूर कोयला घाट परिसरात ही बोट बुडाली आहे. मुशीगंज भागात हा अपघात झाला असून पोलीस व काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मालवाहू जहाज हे घटनास्थळावरून निघून गेले. बोट मुशीगंज भागाकडे जात असताना हा अपघात झाल्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले असून चौकशीसाठी नारायणगंजचे उपायुक्त मोस्तेन बिल्लाह यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे.

जिल्हा प्रशासनाने मृतांच्या नातेवाइकांना २५ हजार टका इतकी भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. बांगलादेश आंतरदल वाहतूक प्राधिकरणानेही या प्रकरणी चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. जी बोट बुडाली त्यात १५० प्रवासी होते. पोलीस अधिकारी दीपक चंद्र साहा यांनी सांगितले की, यातील ५०-६० जण पोहून किनाऱ्याला लागण्यात यशस्वी झाले असून तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वादळामुळे मदतकार्य सुरू करण्यात विलंब झाला पण मदतकार्य अजूनही सुरू आहे, असे नारायणगंजचे जिल्हा अग्निशमन उपसंचालक अब्दुल्ला अल आरेफिन यांनी सांगितले.