केरळच्या कोझिकोड विमातळावरील दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी धाव घेणाऱ्या स्वयंसेवकांना करोनाची लागण झाली आहे. विमानतळावर धावपट्टीवरून विमान घसरल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाठी धाव घेत यंत्रणा कामाला लागल्या होत्या. दुर्घटनाग्रस्त विमानातील जास्तीत जास्त प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. यावेळी काही स्थानिकही मदतीसाठी तिथे पोहोचले होते.

मल्लपुरमचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सकीना यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “विमानतळावरील सुत्रांकडून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बचावकार्यात सहभागी २६ लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे”.

केरळमध्ये विमान दुर्घटनेनंतर पुढच्या पाच मिनिटात नेमकं काय घडलं ?

जिल्हाधिकारी के गोपालकृष्णन, पोलिस अधीक्षक यू अब्दुल करीम यांच्यासहित पोलीस आणि अग्निशमन दलातील २१ जणांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजणदेखील बचावकार्यात सहभागी होते.

दुर्घटनागस्त विमानातील वैमानिकासह एकूण १९ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. लॅण्डिंग होत असतानाच विमान धावपट्टीवरुन घसरलं आणि थेट खोऱ्यात जाऊन पडलं आणि दोन तुकडे झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली होती. दुर्घटना मोठी असल्याने काही ठराविक स्थानिकांना बचावकार्यासाठी आतमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांकडून बचावकार्यात सहभागी स्थानिकांचं कौतुकही करण्यात आलं होतं. वाचलेला एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी बचावकार्यात सहभागी झालेल्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितलं होतं.