नवी दिल्लीत एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला होता. ‘सॉरी आई, बाबा…मला माफ करा. आयटीओ पुलाखाली तुम्हाला माझा मृतदेह सापडेल’, असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. पोलिसांनी शोध घेतला असता तीन दिवसांनी त्यांना दिल्लीमधील यमुना नदीजवळ तरुणाचा मृतदेह सापडला.

हर्ष खंडेलवाल असं या पीडित तरुणाचं नाव आहे. हर्ष ३० जूनच्या रात्री आपल्या सहा मित्रांसोबत एका मित्राच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. १ जुलैला कुटुंबीयांना आणि काही जवळच्या नातेवाईकांना हर्षच्या मोबाइलवरुन व्हॉट्सअॅप मेसेज आला. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, ‘सॉरी आई, बाबा…मला माफ करा. माझी स्कुटर, पर्स आणि इतर गोष्टी तुम्हाला आयटीओ पुलाव तुम्हाला सापडतील. तर माझा मृतदेह पुलाच्या खाली असेल’.

मेसेज वाचल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ आयटीओ ब्रीजच्या दिशेने धाव घेतली. त्यांना हर्षचं सामान मिळालं, पण मृतदेह सापडला नाही. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. पोलिसांनी त्यावेळी हे प्रकरण जास्त गांभीर्याने घेतलं नाही असा कुटुंबीयांचा आरोप आहे.

तीन दिवसांनी ३ जुलै रोजी यमुना नदीशेजारी हर्षचा मृतदेह सापडला. कचरा गोळा करणाऱ्यांना हर्षचा मृतदेह दिसला होता. कुटुंबीयांना हर्षची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. १ जुलै रोजी जेव्हा आपण हर्षशी बोललो तेव्हा लगेच घरी येतो असं त्याने सांगितलं होतं. पण काही वेळातच हा व्हॉट्सअॅप मेसेज आला अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

पोलीस सध्या हर्षच्या मित्रांची चौकशी करत असून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष आपल्या कुटुंबीयांसोबत चांदनी चौक परिसरात राहत होता. एका ऑनलाइन कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करायचा.