२००८ मध्ये मुंबई येथे ‘लष्कर ए तय्यबा’ ने केलेल्या हल्ल्यामागे अण्वस्त्रधारी असलेल्या भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध घडवून दक्षिण आशियाचे भवितव्य नाटय़मयरीत्या बदलून टाकण्याचा इरादा होता, असे अमेरिकेतील दहशतवादविरोधी तज्ज्ञ ब्रुस रिडेल यांनी म्हटले आहे. मुंबई येथील अणुशक्ती केंद्राची छायाचित्रे हल्ल्याची आखणी करण्यासाठी मिळवण्याचे काम लष्कर ए तय्यबाने डेव्हीड हेडली याला दिले होते, असा उल्लेखही त्यांनी या लेखात केला आहे.
एका अमेरिकी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात ते म्हणतात की, लष्कर-ए-तय्यबा या संघटनेने लक्ष्य ठरवलेले होते त्यासाठी त्यांच्या लोकांना अनेक वर्षे प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स) व अल काइदा या दोघांचे त्यांना सहकार्य होते.
मुंबईतील हल्ल्यामागचा हेतू दक्षिण आशियाचे भवितव्य भारत व पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशात युद्ध भडकवून बदलण्याचा होता, असे त्यांनी म्हटले आहे.  आयएसआय व अल काइदा यांचा हल्लेखोरांना मदत करण्यात वेगवेगळा हेतू होता, असे त्यांनी ‘द बीस्ट’ या वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे.
रिडेल यांच्या मते मुंबईतील हल्ला हा अमेरिकेतील ९/११ नंतरचा सर्वात महत्त्वाचा हल्ला होता. भारतीय, अमेरिकी, ज्यू लोक हे अल काईदाने १९९० मध्ये सुरू केलेल्या जागतिक जिहादनुसार त्यांचे लक्ष्य होते. रिडेल यांनी सांगितले की, मुंबई हल्ल्यात मूळचा पाकिस्तानी  असलेला अमेरिकेचा नागरिक  डेव्हीड हेडली याचा जो सहभाग होता ती धक्कादायक बाब होती. त्याने या हल्ल्यासाठी गुप्तचर माहिती गोळा केली होती. हेडली याने मार्च २०१० मध्ये या हल्ला प्रकरणी खुनाचा कट केल्याप्रकरणी दोषी असल्याची कबुली दिली होती.
रिडेल म्हणतात की, हेडली हा पाकिस्तानात पाच वेळा येऊन गेला. तेथे त्याने शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची माहिती , गुप्तचर माहिती, टेहळणी, गुप्त कारवाया व इतर दहशतवादी कारवाया करण्याची आवश्यक माहिती लष्कर ए तय्यबा व आयएसआय यांच्याकडून मिळवण्यासाठी त्याने पाकिस्तानला भेट दिली. अमेरिकेहून भारतात जाऊन मुंबई हल्ल्यांसाठी टेहळणी करण्याचे काम हेडलीवर सोपवण्यात आले होते.त्याच्या कबुलीजबाबात प्रत्येक टप्प्यावर हल्ल्याच्या नियोजनात आयएसआयचा सहभाग होता .