अमेरिकन वंशाचा लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी आणि मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलोमन हेडली याला पुढील वर्षी १७ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर हेडलीचा सहकारी तहव्वूर राणा याला त्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १५ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येईल. तहव्वूर राणाला ४ डिसेंबरला शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र, ही तारीख बदलून १५ जानेवारी करण्यात आली आहे.
हेडली आणि राणा या दोघांवरही मुंबईवर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप सिद्ध झाला असून शिकागो न्यायालय या दोघांना शिक्षा सुनावणार आहे.  
डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा यांच्यावर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग आणि डेन्मार्कमधील एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्याची योजना आखल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश हॅरी लेनेनवेबर दोघांना शिक्षा सुनावणार आहेत, अशी माहिती शिकागोच्या न्यायालयाचे प्रवक्ते रॅन्डल सॅमबॉर्न यांनी दिली. हेडलीनं २०१० मध्ये आपल्यावरची कबूली दिली होती. या आधारावर त्याचा साथीदार राणालाही दोषी ठरवण्यात आलं असून दोघांनाही किमान तीस वर्षांची शिक्षा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.